कच्छमधून पाकिस्तानच्या हेराला अटक   

अहमदाबाद : गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील सीमावर्ती भागातून दहशतवाद विरोधी पथकाने पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्‍या एकाला अटक केली. सहदेव सिंह गोहिल (वय २८) असे या गुप्तहेराचे नाव असून, तो आरोग्य कर्मचारी आहे.सहदेव सिंह जून २०२३ पासून अदिती भारद्वाज नावाच्या पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात होता. भारतीय सीमा, बीएसएफ आणि भारतीय नौदलाच्या कारवाया, परिसराची छायाचित्रे आणि इतर संवेदनशील माहिती त्याने पाकिस्तानला पाठवली होती. त्याने गुजरातच्या अनेक सीमावर्ती भागांची माहितीही शेअर केली होती.
    
 जानेवारी २०२५ मध्ये सहदेव सिंहने त्याच्या आधार कार्डचा वापर करून एक भारतीय सिम कार्ड मिळवले. फेब्रुवारी २०२५ मध्ये त्याने ते सिम कार्ड  आदिती भारद्वाजला दिले. त्याद्वारे दोघांमध्ये व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंग आणि मेसेजिंग सुरू झाले. हेरगिरीच्या बदल्यात सहदेव सिंहला ४० हजार रुपयांपर्यंतची रक्कम मिळाली होती. त्याचा फोन फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये पाठवण्यात आला आहे. केंद्रीय गुप्तचर संस्थांनी पुष्टी केलेल्या तांत्रिक देखरेख आणि मानवी गुप्तचर माहितीच्या तपासानंतर एटीएसने १ मे रोजी गोहिलला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. गोहिल आणि अदिती भारद्वाज दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.  गेल्या आठ महिन्यांत हेरगिरीच्या आरोपाखाली गुजरातमधून झालेली ही तिसरी अटक  आहे.

Related Articles